लांजा तालुक्यातील भूसंपादनाची रखडलेली प्रकरणे मार्गी लावा: ना. सामंत

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणातील लांजा तालुक्यातील 18 प्रलंबित भूसंपादन प्रकरणे लवकर निकाली काढून थांबलेल्या 8 प्रकरणी निवाडे देवून काम लवकरात लवकर सुरु करा, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. यावेळी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंडया साळवी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

सिंधुदूर्ग जिल्हयात महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.  मात्र रत्नागिरी जिल्ह्यात काम 2018 पासून रखडल्याबाबत तसेच या महत्वाच्या विषयात प्रांताअधिकारी खाडे यांनी बैठकीस उपस्थित न राहिल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
लांजा शहराला होणार्‍या पाणीपुरवठा योजनेचे काम महामार्ग उभारणीमुळे नव्याने करावे लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानाला 1 कोटी 70 लाख रुपयांचा निधी दिला आहे. पुढील 15 वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन येथील जलवाहिनी 80 मिमी ऐवजी आता 100 मिमी व्यासाची असेल असे नियोजन केले आहे.