लांजा आगाराची वाहतूक तीन तास ठप्प

लांजा:- लांजा एसटी आगारातील सर्व एसटी कर्मचार्‍याना जुलै ते सप्टेंबर पर्यंतचे पूर्ण वेतन कर्मचार्‍याची रजा न वापरता देण्यात यावे या मागणीसाठी लांजा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांच्या वतीने सोमवारी कर्मचार्‍यासोबत कामबंद आंदोलन छेडले होते परिणामी लांजा आगाराची वाहतूक सकाळी सात वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत ठप्प करण्यात आली होती.
  

दरम्यान, रत्नागिरी मध्यवर्ती कार्यालयाकडून कर्मचार्यांचे पगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यानी आपले आंदोलन मागे घेतले. त्यानंतर ठप्प झालेली एसटी वाहतुक सुरू झाली.
  

लांजा आगारातील सर्व कर्मचार्‍याचे जुलै ते सप्टेंबर पर्यंतचे पूर्ण वेतन देण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यानी लांजा आगार व्यवस्थापक पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले होते. तसेच ११ आॅक्टोबर पर्यंत मागण्या मान्य होवून एसटी कर्मचार्‍याना न्याय न मिळाल्यास १२ आॅक्टोबर रोजी कर्मचार्‍यासोबत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दाजी गडहिरे व पदाधिकार्‍यानी दिला होता. 
            

याबाबत आज सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलचे तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे, तालुका खजिनदार संजय खानविलकर, जिल्हा चिटणीस अभिजीत राजेशिर्के, युवक अध्यक्ष बाबा धावणे, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव व पदाधिकार्‍यानी लांजा आगारात सकाळी ७ वाजल्यापासुन आंदोलनाला सुरूवात केली. त्यामुळे लांजा तालुक्यात जाणार्या सर्व एसटी फेर्‍या ठप्प झाल्या होत्या. अखेर १० वाजता  लांजा एसटी आगार व्यवस्थापक श्री. पाटील यांनी रत्नागिरी मध्यवर्ती कार्यालयाला या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी या कार्यालयाकडून कर्मचार्‍याचे पगार देण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍याना दिले. यानंतर पदाधिकार्‍यानी आपले आंदोलन मागे घेतले