लांजात शॉर्ट सर्किटने बागेला आग, १५ लाखांचे नुकसान

21 एकर जागेतील 426 हापूस कलमे, 500 काजू कलमे खाक

लांजा:- वीज वाहिनीच्या शॉर्ट सर्किटने आग लागल्याने लांजातील हर्चे येथे आंबा-काजू बाग जळून खाक झाली आहे. या आगीत 3 शेतकऱ्यांचे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.

हर्चे गोरेवाडी येथे महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. २१ एकर जागेतील फळधारण होत असलेली आंबा- काजू झाडे असलेल्या एकूण 3 बागा जळून खाक झाल्या असून 3 शेतकऱ्यांचे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग आणि जास्त गवत असल्याने या तीनही बागा जाळाल्या. शेतकऱ्यांनी बागेच्या दिशेने धाव घेतली. मात्र आगीच्या रौद्ररूपामुळे बागा जाळून खाक झाल्या.

या बागांची एका महिन्यांपूर्वी फवारणी केली होती. तसेच त्यामधील हापूसच्या झाडांना फळधारणा झाली होती. तीनही शेतकऱ्यांच्या एकूण २१ एकर जागेतील ४२६ हापूस कलमे तर काजूची ५०० कलमे जाळून मोठे नुकसान झाले आहे. महादेव लक्ष्मण गोरे, संजय तुकाराम गोरे व सुरेंद्र सुधाकर नागवेकर असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.