लांजा:- तालुक्यातील गवाणे रेवाळेवाडी येथे शेकोटी घेत असताना साडीला आग लागून गंभीर भाजल्याने एका ४४ वर्षीय गतिमंद महिलेचा रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली.
नंदा कमलाकर रेवाळे (४४, रा. गवाणे रेवाळेवाडी, ता. लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या लहानपणापासून गतिमंद होत्या. गुरुवारी, ५ जून रोजी त्या घरात चुलीमध्ये विस्तव पेटवून शेकोटी घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावरील साडीला चुलीतील विस्तवाची आग लागली आणि साडीने पेट घेतला. यात नंदा रेवाळे या पायापासून मानेपर्यंत सुमारे ७० टक्के भाजल्या.
त्यांना तात्काळ नातेवाईकांनी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, उपचारादरम्यान रात्रीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.