लांजा:- तालुक्यातील वेरळ येथील लक्ष्मीकांत मंदिराजवळ शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बांधकामासाठी काँक्रीट वाहतूक करणारा मिक्सर रस्त्याचा भाग खचल्याने बाजूला असलेल्या पऱ्यात कोसळला. या दुर्घटनेत मिक्सरचा चालक जागीच ठार झाला.
पावडाप्पा चंद्राम मादर (वय २१, मूळ राहणार डोनूर, ता. बसवन बागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक; सध्या नाचणे, रत्नागिरी) असे मृत चालकाचे नाव आहे. वेरळ गावातील लक्ष्मीकांत मंदिराजवळ पाखाडी रस्त्याचे बांधकाम सुरू असून, संबंधित ठिकाणी मिक्सर चालक म्हणून पावडाप्पा मादर काम करत होता.
शनिवारी सकाळी मिक्सरमध्ये काँक्रीट भरून लक्ष्मीकांत मंदिराकडे जात असताना कच्च्या डांबरी रस्त्यावरून वाहन नेत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूचा भाग अचानक खचला. यामुळे मिक्सर चालकासह थेट रस्त्यालगतच्या लक्ष्मीकांत पऱ्यात कोसळला. मिक्सरखाली अडकून चालक गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर तातडीने त्याला लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताचा तपास लांजा पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस करत आहेत.









