लांजात बिबट्याचा पोल्ट्रीफार्मवर हल्ला; तब्बल ५०० कोंबड्या फस्त

लांजा: दोन बछड्यांसह मादी बिबट्याने पोल्ट्रीफार्मवर हल्ला केला. यात पोल्ट्रीफार्म मधील ५०० गावठी व गावरान कोंबड्या फस्त केल्या. ही घटना लांजा तालुक्यातील खावडी कोतवडेकरवाडी येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली आहे. या घटनेत पोल्ट्री मालकांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

लांजा तालुक्यातील खावडी कोतवडेकरवाडी याठिकाणी खावडी एसटी स्टॉप नजीक सखाराम सिताराम कोतवडेकर, संदेश सखाराम कोतवडेकर, मंगेश सखाराम कोतवडेकर व सुरेश सखाराम कोतवडेकर यांनी पाच महिन्यांपूर्वी पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला होता. पोल्ट्री व्यवसायासाठी त्यांनी पत्र्याची शेड मारली आहे. मात्र दोन्ही बाजूने आवश्यक त्या प्रमाणात भिंत नसून एका बाजूने ग्रीन नेटची जाळी मारण्यात आली होती. या पोल्ट्री फार्ममध्ये गावरान आणि गावठी कोंबडी पाळण्यात आल्या होत्या. या ठिकाणी आठ महिन्यांची व दोन ते अडीच किलो वजनाचे 500 पक्षी होते. शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास बिबट्या मादीने आपल्या दोन बछड्यांसह या पोल्ट्री फार्म हल्लाबोल केला. ज्या बाजूला ग्रीन नेट होते ते ग्रीन नेट फाडून या बिबट्याने पोल्ट्री शेडमध्ये प्रवेश केला. यावेळी आतमध्ये सखाराम कोतवडेकर, मंगेश कोतवडेकर व सुरेश कोतवडेकर होते. ग्रीन नेट कोण फाडत आहे हे पाहण्यासाठी ते जवळ गेले असता मादी बिबट्या व दोन बछड्यांना पाहून त्यांची भितीने बोबडी वळली. त्यानंतर या तिघांनी पुढील दरवाजाने घराकडे धुम ठोकली. ते घरून पुन्हा येईपर्यंत मादी बिबट्या आणि दोन बछडे यांनी केलेल्या हल्ल्यात या पोल्ट्री फार्म मधील सुमारे पाचशे गावरान व गावठी कोंबड्या मारल्या गेल्या. यातील काही कोंबड्या या तिघांनी फस्त केल्या आणि त्यानंतर सर्वजण जंगलाकडे निघुन गेले. या घटनेत कोतवडेकर बंधूंचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे बिबट्याने पोल्ट्रीफार्म हल्ला केल्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते याबाबत लांजा येथील व नात्यातल्या या घटनेची माहिती देण्यात आली आहे दरम्यान बिबट्याच्या हल्ला आणि मुक्त संचार यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.