लांजा:- लांजा–साटवली मार्गावरील गोळवशी डंगाच्या कोपऱ्यावर गुरुवारी दुपारी कॅरी टेम्पोने एसटी बसला दिलेल्या धडकेत टेम्पोतील चौघेजण जखमी झाले. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पो चालकावर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस चालक प्रशांत पांडुरंग यादव (वय ४५, रा. कुरूपवाडी, ता. लांजा) यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. ते रुण–लांजा या मार्गावर एसटी बस (क्र. एमएच-१४-बीटी-१४८३) घेऊन येत असताना दुपारी सुमारे १.३० च्या सुमारास गोळवशी डंगाच्या कोपऱ्यावर चढणीदरम्यान लांजाहून देवी–हसोळकडे जाणारा कॅरी टेम्पो (क्र. एमएच-०७-एजे-०१७२) अचानक पुढील बाजूला येऊन बसला धडकला.
हा टेम्पो फिरोज इकबाल शेख (वय ३८, रा. आरवली, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) चालवत होता. धडकेत टेम्पो चालक फिरोज शेख, सलमा फिरोज शेख (वय ३५), योगेश रमाकांत राऊळ (वय ३३, रा. आम्रट, ता. कुडाळ) आणि योगिनी योगेश राऊळ (वय २५) असे चार जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक देवकन्या मैंदाड, पीएसआय भालचंद्र रेवणे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे आणि महिला कॉन्स्टेबल नैना राणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्वतःच्या ताब्यातील वाहन बेफिकीरपणे चालवून अपघात घडवून चौघेजणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच एसटी बसच्या नुकसानीबाबत टेम्पो चालक फिरोज शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय देवकन्या मैंदाड करत आहेत.









