पहिल्या लाभार्थी डॉ. सई धुरी: लस मात्रेचा शुभारंभ
रत्नागिरी:-कोरोनावरील कोविशिल्ड लसीचा पहिला डोस आज मी घेतला. अनुभव खूप चांगला होता. डोस घेताना आणि घेतल्यानंतर मला कोणताही त्रास जाणवला नाही. अतिशय नियोजनबद्ध हे लसीकरण झाले. अर्धा तास मी निगराणीखाली होते. त्यानंतर माझ्या सेवेत कोणताही खंड न पडता माझे कर्तव्य बजावत होते. कोणताही विपरित परिणाम जाणवला नाही, अशी प्रतिक्रिया कोविडची पहिली लस घेणार्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सई धुरी यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आज कोरोनावरील लसीचा शुभारंभ ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. 100 कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी वर्गाला लस देण्याची व्यवस्था करण्यात आली.
डॉ. धुरी म्हणाल्या, कोरोनावरील लसीचा पहिला लाभार्थी म्हणून आजचा अनुभव चांगला होता. कोरोनावरील कोविशिल्डच्या लसीचा 0.5 एमएमचा पहिला डोस घेतला. त्यानंतर मला 30 मिनिटे निगराणीखाली ठेवण्यात आले. लस घेतानाही काही त्रास झाला नाही आणि त्यानंतरही. मी अर्ध्या तासाने पुन्हा ड्यूटीवर गेले.