रत्नागिरी:- कोरोनाच्या महामारीत प्रत्येकजण आपल्यापरीने मदतीसाठी पुढाकार घेत आहे. रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील उद्योजक सौरभ मलूष्टे या तरुणाने लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी मोफत रिक्षाची व्यवस्था केली आहे. एक कॉल करा आणि रिक्षा तुमच्या दारात अशी मदतीची नवी संकल्पना सौरभ मलूष्टे या तरुणाने हाती घेतली आहे.
सर्वत्र कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकच प्रभावी उपाय समोर आला आहे. लसीकरण करून घेण्यासाठी अनेकजण सकाळपासून लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत. जवळ वाहन नसल्याने अनेकांना लसीकरण केंद्र गाठताना दमछाक होत आहे. अशांसाठी सौरभ मलूष्टे हा तरुण धावून आला आहे.
साळवी स्टॉप ते शिवाजी नगर या भागात मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भागात राहणारे जेष्ठ नागरिक, महिला आणि ज्यांच्याकडे वाहन नाही अशा सर्वांना कोकण नगर लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी ही मोफत रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या आदल्या दिवशी एक फोन कॉल केल्यानंतर लसीकरणा दिवशी लसीकरण केंद्रावर सोडण्यासाठी आणि परत घेऊन येण्यासाठी रिक्षा सेवा पुरवली जाणार आहे. रिक्षामध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली. यासाठी सौरभ मलूष्टे 7972130853, योगेश वीरकर 9527623696 आणि सुनील बेंडखळे 9028878344 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.