रत्नागिरी:– कोरोना पतिबंधासाठी लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरणासाठी शासनाकडून 30 नोव्हेंबरची ‘डेडलाईन’ देण्यात आलेली असल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडालेली आहे. रत्नागिरी तालुक्यात पहिल्या डोसचे लसीकरण पूर्णत्वास नेण्यासाठी आशांना घरोघरी जाउन सर्वेक्षणाच्या सक्त सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. डोस न घेतल्यांची नावांची यादी जमा करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.
रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती सौ. संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत तालुक्यातील कोरोना लसीकरणाचा आरोग्य विभागाच्यावतीने आढावा देण्यात आला. थ्यावेळी गुरूवारपर्यंत तालुक्यात फक्त 15 ॲक्टीव कोरोनाचे रुग्ण असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी सांगितले. त्यामध्ये ग्रामीण भागात 10 तर शहरी भागात 5 रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची माहिती देताना पहिल्या डोसचा 2,1,248 जणांना लाभ (83 टक्के) तर दुसऱ्या डोसचा 91,653 लोकांनी लाभ (37 टक्के) घेतल्याचे सांगितले.
येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत लसीच्या पहिल्या डोसचा लाभ 100 टक्के पूर्णत्वास नेण्यात यावा असे शासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तालुक्यात ही मोहिम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आरोग्य विभागाने डोळ्यासमोर ठेवलेले आहे. आजही लस घेण्यास अनेक भागात नागरिकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा लोकांना लस देण्यासाठी आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाउन सर्वेक्षणाच्या सक्त सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. ज्या ठिकाणी कमी लसीकरण झालेले आहे, त्याठिकाणी तात्काळ लसीकरण शिबीरे घेतली जाणार असल्याचे डॉ. महेंद्र गावडे यांनी सांगितले.
शासनामार्फत एनएएस (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण) परिक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातून 46 शाळांची निवड झालेली आहे. यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. वाचन, लेखन, यांचा या सर्वेक्षणात विचार करून परिक्षेचा निकाल दिला जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलभूत क्षमतेचे सर्वेक्षण होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या सभेला उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, विजय पोकळे, नायब तहसिलदार गोसावी यांची पमुख उपसिथती होती.