लसीकरणाबाबत ना नगरसेवकांची तक्रार ना नागरीकांची: नगराध्यक्ष साळवी 

रत्नागिरी:-शहरात चार महिन्यांपासून पालिकेच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. ३० नगरसेवकांना लसीचे समान वाटप केले जात आहे. यामध्ये कोणताही पक्षीय भेदभाव नाही. त्यामुळे कोणत्याही नगरसेवक अथवा नागरीकांची लसीकरणाबाबत तक्रार नाही. ऑनलाईन लसीकरणाला अडथळा येत असल्याने या ऑफलाईन लसीकरणामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. अनेकांनी या मोहिमेच कौतुक केले. मात्र काही व्यक्ती वारंवर या मोहिमेला सोशल मीडियावर बदनाम करून संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र या विघ्नसंतुष्टांकडे लक्ष न देता नागरिकांच्या सेवेसाठी ही मोहिम सुरूच ठेवणार, अशी स्पष्ट भुमिका नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी व्यक्त केली.  

पालिकेत लसीकरणाबाबत पत्रकारांशी झालेल्या औपचारिक चर्चेवेळी त्यांनी ही भुमिका स्पष्ट केली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक आणि सेनेचे गटनेते राजन शेट्ये, आरोग्य सभापती निमेश नायर, बांधकाम सभापती बाबा नागवेकर, भाजपचे नगरसवक राजू तोडणकर उपस्थित होते.श्री. बंड्या साळवी म्हणाले, कोरोना महामारीलवर प्रभावी उपाय म्हणून लसीकण महत्त्वाचे आहे. मात्र ऑनलाईन नोंदणी करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यात कमी प्रमाणात डोस येत असल्याने मोजक्याच लोकांच्या नोंदणीमुळे काही मिनिटात नोंदणी फुल्ल होते. सर्वसामान्यांना त्यासाठी लसीकरण केंद्रावर रांगेत उभा राहुनही त्यांना लस मिळत नाही. या गैसोयीचा विचार करून जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि रत्नागिरी पालिकेने संयुक्त शहराध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन लसीकरण मोहिम लाबविण्याचा निर्णय घेतला. मंत्री उदय सामंत, सेनेचे नेते किरण सामंत यांच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. गेली चार महिने ही मोहिम सुरू आहे. शहरात मागणी भरपुर आहे. मात्र जिल्ह्यासाठी येणारे डोस मर्यादीत आहेत. त्यामुळे पालिकेच्या वाट्याला आलेल्या लसीपैकी ७० टक्के ऑफलाईन आणि ३० टक्के ऑनलाईन लसीकरण सुरू आहे.

ऑफलाईन लसीकरणाचा कार्यक्रम पालिकेच्या सभागृहात सुरू आहे. त्यावर पालिकेचे पुर्ण नियंत्रण आहे. कोणताही भेदभाव न करता ३० नगरसेवकांना लसीचे समान वाटप केले जाते. गर्दी टाळण्यासाठी त्या-त्या प्रभागातील नगरेसवक मोजक्याच नागरिकांना पाठवून उत्तम नियोजनात लसीकरण केले जात आहे. मात्र या मोहिमेला विनाकारण बदनाम करण्याचे काम एखाददुसरी व्यक्ती करीत आहे. यातून नागरिकाध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र अनेक नागरिकांनी या मोहिमेचे कौतुक करून नागरिकांच्या सोयिसाठी ही मोहिम आवश्यक असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे विघ्नसंतुष्टांकडे लक्ष न देता नागरिकांच्या सेवेसाठी ही मोहिम सुरू ठेवणार, असे श्री. साळवी म्हणाले.