लग्नानंतर वाडीला जेवण न दिल्याच्या रागातून तीन वर्षांसाठी कुटुंब वाळीत 

लांजा:- जुन्या रुढी, परंपरा, चालीरितीमुळे ग्रामीण भागात अनेक अंधश्रध्देला खतपाणी घातले जात आहे. लांजा तालुक्यातील आसगे येथे एका कुटुंबाला तब्बल 3 वर्षे वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. आसगे टोळेवाडी येथील सुधीर चौगुले, सुहास चौगुले, अक्षय दैत या कुटुंबाला वाळीत टाकल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

शुल्लक कारणावरुन गेल्या 3 वर्षापासून या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे. 2019 साली सुहास चौगुलेंचा भाचा अक्षय दैतचे लग्न होते. लग्न झाल्यानंतर वाडीतील लोकांना जेवण देण्याची पध्दत आहे. त्यानुसार वाडीतील प्रमुखांनी दोन वेळा जेवण देण्याचा आग्रह धरला. मात्र कोरोना कालावधी असल्याने लोकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढेल आणि शासन नियमांचा भंग होईल म्हणून सुधीर चौगुले यांनी एकच वेळ जेवण देतो असे सांगितले. याला विरोध करत काही नागरिकांनी वाडी परंपरेनेच जेवण हवे असा हट्ट धरला. याला असमर्थता दर्शवल्याने चौगुले कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले असे चौगुले कुटुंबाचे म्हणणे आहे. तेव्हापासून वाडी, गावा कुणीच त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कुटुंबातील सर्व महिला, पुरुष मानसिक तणावाखाली आहेत असे चौगुले यांनी सांगितले. 

या प्रकाराची माहिती 2019 चे आसगे गावचे तंटामुक्ती अध्यक्षांना देण्यात आली होती, मात्र त्यांनी चौगुले कुटुंबालाच उलट उत्तरे दिली. त्यानंतर वाद वाढू नयेत यासाठी चौगुले कुटुंबाने मार्ग काढण्यासाठी वाडीतील प्रमुखांशी चर्चेचा प्रयत्न केला. मात्र तिथेही विरोध करण्यात आला. वाडीतील कोणत्याही सामूहिक कार्यक्रमात उत्सवातून चौगुले कुटुंबाला लांब ठेवण्यात आले आहे. गेली 3 वर्षे वाळीत टाकल्यामुळे हे कुटुंब दबावाखाली आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे देवून मार्ग काढावा अशी मागणी चौगुले कुटुंबाने केली आहे.