पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यास कोरोना चाचणी
रत्नागिरी:- लक्षणे नसलेल्या मात्र कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात येणार आहे. या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी 17 दिवसांचा असून या कालावधीत संबंधित रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नवे नियम जाहीर केले आहेत. यात नागरीकांना संशयीत लक्षणे आढळून आल्यास तसेच पॉझिटीव्ह रुग्णाच्या सानिध्यात आल्यास अथवा पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यातून प्रवास करुन आल्यास आरटिपीसीआर किंवा अँटिजेन चाचणी करणे अत्यंत महत्वाचे आहे.
लक्षणे नसलेल्या परंतू कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तिकरिता होम आयसोलेशन करण्यात येणार आहे. सदर होम आयसोलेशनचा कालावधी हा एकूण १७ दिवसाचा आहे. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तिंनी होम आयसोलेशन केल्यानंतर १७ दिवस घराबाहेर पडू नये. जर संबंधित व्यक्ती घराबाहेर फिरतांना आढळून आली तर सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यांत येणार आहे.
ज्या व्यक्तींना लक्षणे असतील अशा व्यक्तींनी आरटिपीसीआर चाचणी करावी व ज्या व्यक्ती करोना रुग्णाच्या सहवासीत असून परंतु त्या व्यक्तींना लक्षणे नसतील अश्या व्यक्तींनी अँटीजेन चाचणी करणे गरजेचे आहे. तसेच ज्या व्यक्तींची आरटिपीसीआर चाचणी घेण्यांत आली आहे अश्या व्यक्तींनी चाचणी अहवाल येईपर्यंत घराबाहेर पडू नये .
सध्या रत्नागिरी शहरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची मोबाईल टिमव्दारे अँटीजेन चाचणी करण्यांत येईल. वारंवार एखादी व्यक्ती जर विनाकारण बाहेर फिरत असेल तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल. कोरोना संशयित व्यक्तिंकरिता किवा चाचणी करावयाच्या असतील तर शिर्के हायस्कुल, माळनाका येथे आरोग्य पथक कार्यरत करण्यांत आलेले असून कोरोना संशयित व्यक्तींनी शिर्के हायस्कुल येथे संपर्क साधावा.