रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षी लंपी स्कीन डीसीज या आजाराचा प्रादुर्भाव झालेली जनावरे आढळली होती. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव यावर्षीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आजाराचा प्रादुर्भाव मुख्यत्वे चावणार्या माश्या, डास, गोचीड, चिलटे, पिसवा तसेच बाधित जनावरांचा स्पर्श दुषित चारा-पाणी यांच्या मार्फत होतो. रोग प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दुष्टिने लंपी स्कीन डिसीज या आजारांचे लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा असे आवाहन आवाहन पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, रत्नागिरी यांनी केले आहे.
लंपी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य त्वचारोग असून हा रोग मुख्यत्वे गायी व म्हशीमध्ये येतो. विदेशी वंशाच्या आणि संकरीत वंशाच्या गायीमध्ये देशी वंशाच्या गाईपेक्षा रोग बाधेचे प्रमाण अधिक आढळून येते. उष्ण व दमट हवामान रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. या आजारामुळे होणार्या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी जनावरांचे विवीध स्त्राव जसे डोळयातील पाणी, नाकातील स्त्राव, लाळ इ. मधून हा विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होऊन इतर जनावरांना या रोगाची लागण होऊ शकते. या रोगामध्ये अंगावर 10 ते 20 मीमी व्यासाच्या गाठी येतात. सुरवातीस भरपूर ताप, डोळयातून, नाकातून चिकट स्त्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा दूध उत्पादन कमी व काही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणे या सारखी लक्षणे दिसून येतात. रोगी जनावरे अशक्त होत जातात, त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. यावर्षी राजस्थानमध्ये लंपी रोगाच्या प्रादुर्भावामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.
या आजाराचे लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किवा पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती रत्नागिरी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार रत्नागिरी, गट विकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी, सहा. आयुक्त पशुसंवर्धन तालपसचि रत्नागिरी व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती रत्नागिरी यांनी केले आहे.