‘रो-रो’ सेवेतून कोकण रेल्वेने कमावला 33 कोटींचा गल्ला

रत्नागिरी:- कोणत्याही मार्गावर मालवाहतूक रेल्वे सेवा आर्थिक कणा समजला जातो. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेची मालवाहतुकीची सेवा रेल्वेसाठी दुवाच ठरली आहे. वर्षभरात कोकण रेल्वेने ‘रो-रो’ सेवेतून तब्बल 32 कोटी 98 लाखांचा गल्ला जमवला आहे. 14 हजार 21 मालवाहतूक टकच्या 344 फेर्‍यांतून रेल्वे प्रशासनाची भरघोस कमाई झाली आहे.

प्रदूषणमुक्त अन् सुरक्षित सेवेमुळे ‘रो-रो’ सेवेला सर्वाधिक पसंती मिळत आहे. ‘रोल ऑन रोल ऑफ सेवा’ हा मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगळा मार्ग तयार करण्यात कोकण रेल्वे कमालीची यशस्वी ठरली आहे. कोकण रेल्वेने 26जानेवारी 1999 मध्ये ‘रो-रो’ सेवेला प्रारंभ केल्यानंतर सुरूवातीच्या काळात मालवाहतुकीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र गेल्या 25 वर्षात सरासरी 8 लाख टक ‘रो- रो’ सेवेच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचवण्यात आल्याची माहितीउपलब्ध झाली आहे. या ‘रो-रो’ सेवेच्या माध्यमातूनकोकण रेल्वेला गेल्या 3 वर्षात 200 कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सुरुवातीच्या काळात ‘रो-रो’ सेवेला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासन अडचणीत सापडले होते. मात्र त्यानंतर ट्रकचालक जेवणासाठी थांबत असलेल्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने व्यापक स्वरूपात जनजागृतीवर भर देत मालवाहतुकदारांशी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली. याचमुळे दिवसागणिक मालवाहतुकदारांची संख्या कमालीची वाढत गेली. ट्रकची होणारी कमी झीज, इंधन बचतीसह वेळेची बचत, मालाची जलद वाहतूक तसेच ताणविरहित चालकांचा प्रवास यामुळे मालवाहतूकदारांच्या नफ्यातही मोठीवाढ झाल्याचे समोर आले आहे. कोकण मार्गावर धावणारी ‘रो रो’ सेवा सद्यस्थितीत कोलाड ते वेर्णा, कोलाड ते सुरतकल व वेर्णा ते सुरतकल या मार्गावर धावत आहे. भविष्यात सेवेचा आणखी विस्तार करण्याच्या विचाराधीनही रेल्वे प्रशासन असल्याचे समजते.