रोहयोतील अकुशल कामगारांचा आर्थिक लाभ थेट बँक खात्यात

रत्नागिरी:- जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर काम केलेल्या अकुशल मजुरांच्या प्रलंबित रकमेतील अडीच कोटीपेक्षा जास्त रक्कम मजुरांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या होत्या. त्यानुसार आणखीन काही रक्कम प्रलंबित असली तरी लवकरच ती मजुरांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, असे रोजगार हमी योजनेच्या प्रशासकीय विभागाने सांगितले.

ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2021-22 या आर्थिक वर्षांत 23.69 लाख मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट होते. त्यात 31 मार्च 2022 अखेपर्यंत 66.80 लाख इतके उद्दिष्ट साध्य झाले आहे. या वर्षांत 158 कोटी 69 लाख 73 हजार इतकी मजुरी मजुरांना प्रदान करण्यात आली. त्यांची मजुरी खात्यावर आठ दिवसांच्या आत प्रदान करण्याचे जिल्ह्याचे प्रमाण 88.74 टक्के आहे. जिल्ह्यात एकूण 2 लाख 35 हजार 737 जॉबकार्डधारक आहेत. आतापर्यंत 83 हजार 768 कुटुंबातील 1 लाख 86 हजार 658 मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

रोजगार हमी योजनेंतर्गत एक लाखाहून अधिक मजूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सुरू असलेल्या कामावर काम करत आहेत. अलीकडील काळात मजुरी वाढली तसेच स्थानिक स्तरावर काम उपलब्ध होत असल्यामुळे कामांवर मजूर येण्याचा ओढा वाढला आहे.  त्याला प्रतिसाद देण्यासाठी  कामांवर माध्यान्ह भोजन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सामुदायिक व केंद्रीय स्वयंपाकघर तयार करण्यात येणार आहे.