रोशनी सोनघरे यांच्यावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत झाला होता मृत्यू

मंडणगड:- अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या बुरी (ता. मंडणगड) येथील रहिवासी आणि त्या विमानातील हवाई सुंदरी रोशनी राजेंद्र सोनघरे वय (२७) यांच्या पार्थिवावर काल (ता. १९) डोंबिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदाबाद येथे १२ जूनला झालेल्या विमान दुर्घटनेत रोशनीचा अपघाती मृत्यू झाला होता. काल तिचे पार्थिव घरी पोहोचताच कुटुंबीय आणि नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सोनघरे हिचे मार्थिव सकाळी न्यू अमिया सोसायटी येथे अंत्यदर्शनाकरिता ठेवण्यात आले होते. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व एअर इंडियाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बुरी येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना पाहून माझी रोशनी कुठे गेली? अशा आर्त स्वरात आईने विचारलेल्या प्रश्नाने उपस्थितांचे डोळे पाणावले व अश्रूचा बांध फुटला. अंत्यदर्शनानंतर रथातून शिवमंदिर परिसरातील स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा मार्गस्थ करण्यात आली व त्या ठिकाणी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.