रत्नागिरी:- बावनदी ते वाकेड दरम्यान रोडवेज सोल्यूशनचा ठेका रद्द करण्याबाबतचा प्रस्तावही केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल आणि याठिकाणी दुसरा ठेकेदार नेमला जाईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे हे काम सुरु होण्यास पुढील जानेवारी महिना उजडेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात असले तरी आरवली ते वाकेड रस्त्याची साडेसाती संपता संपलेली नाही. ‘रोडवेज सोल्युशन’वन या ठेकेदार कंपनीकडे असलेले हे रस्ताचे काम सध्या बंद पडलेले आहे. त्यामुळे हा ठेकेदार बदलण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरु असल्याने महामार्गाची दगदग आणखी किती महिने सहन करावी लागणार असा प्रश्न जिल्हावासियांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील पुलांच्या कामांचे भूमिपूजन सप्तलिंगी नदीवर सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. मात्र या पुलाचे कामही रडतखडत सुरु आहे. मुंबई-गोवा महामार्गाची रडकथा संपतासंपत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्गावरील सिंधुदुर्गमधील रस्ते जवळपास पूर्ण झाले आहेत. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गाचे काम रखडले आहे. कशेळी ते
खेरशेत-आरवलीपयर्र्तच्या टप्प्यांचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. अगदी वाखेड ते खारेपाटण टप्पाही पूर्ण झाला आहे. परंतु आरवली ते बावनदी आणि बावनदी ते वाकेड हे दोन टप्पे कासवगतीने सुरु आहेत. या दोन्ही टप्प्यांची कामे रोडवेज सोल्यूशन या कंपनीकडे असून, या कंपनीने पोटठेकेदार नेमल्यानंतरच रस्त्यांची गती मंद झाली आहे. पोट ठेकेदारांना रोडवेजकडून केलेल्या कामाचाही मोबदला वेळेवर मिळत नसल्याने, पोटठेकेदारांनी कामे बंद केली आहेत.पावसाळ्यामध्ये व गणपती उत्सवादरम्यान महामार्ग चांगला रहावा यासाठी स्वत: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अनेक फेर्या या मार्गावरुन मारत, महामार्गाची एक लेन तरी पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु गणेशोत्सव संपल्यानंतर या महामार्गाचे काम पुन्हा ठप्प झाले आहे. आरवली ते वाकेड दरम्यान दोन टप्प्यात म्हात्रे आणि हॅन्स या दोन कंपन्या पोटठेकेदार म्हणून काम करीत होत्या. परंतु त्यांनी ही कामे बंद केली आहेत. याबाबत भाजपाचीही राजकीय प्रतिष्ठापणाला लागली आहे. स्थानिक पालकमंत्रीही वारंवार केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु यातून मार्ग निघाला नव्हता.
अखेर रोडवेज सोल्यूशन कंपनीकडून ठेका काढून घेण्याबाबत अधिकार्यांनी पत्र व्यवहार केंद्रीय बांधकाम विभागात सुरु केला आहे. त्यामुळे आरवली ते बावनदी दरम्यान रोडवेज सोल्यूशनचा ठेकदार रद्द करुन हे काम आता एचएमपीएलला देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या पंधरावीस दिवसात येथील कामे सुरु होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महामार्गाचे काम रखडवणार्या रोडवेज सोल्यूशनला एक टक्का दंडाची रक्कम भरावी लागणार असून यासाठी प्रस्तावही पाठवण्यात आला असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.