रत्नागिरी:- सुधारित नळपाणी योजनेचे काम पूर्ण होत आले आहे; मात्र या योजनेची पाइपलाइन दरदिवशी शहरात कुठेना कुठे फुटत आहे. पालिकेच्या कार्यालयासमोर तर पुन्हा एकदा ही पाईपलाईन फुटली आहे. पाण्याच्या प्रेशरने ही पाईप फुटल्याचे निदर्शनास आले. यावरून या पाईपचा दर्जा किती सुमार आहे हे लक्षात येते. जीर्ण झालेल्या जुन्या योजनेसारखी दररोज या नवीन योजनेची दुरुस्ती करून पालिकेचे कर्मचारी हैराण झाले आहेत.
आमचे दुखणे कोणाला सांगायचे, अशी स्पष्ट भावना पालिकेच्या पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. पाणीयोजनेबाबत काही झाले की, पालिकेला दोषी ठरवतात; परंतु कन्सल्टिंग एजन्सी म्हणून योजनेच्या 3 टक्के रक्कम घेणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कोणच जाब विचारत नाही, असेही कर्मचारी म्हणत आहेत. सुमारे ६३ कोटीची शहरातील पाणीयोजना पूर्णत्वास जात आहे. पाणीयोजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ती वादातीतच ठरली आहे. पूर्ण झाल्यावर तरी शहरवासीयांना चांगले पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी दर्जेदार आणि आयएसओ नामांकन असलेल्या चांगल्या गेजच्या पाईप बसवल्या जातील, असे सांगण्यात आले; मात्र आता शहरात टाकण्यात आलेल्या पाईप हायड्रोजेनिक टेस्ट करण्यापूर्वी पाण्याच्या प्रेशरने फुटत आहेत.
दरदिवशी शहरात नवीन योजनेची पाईपलईन फुटत आहे. यावरून पाईपचा दर्जा अतिशय हलका आणि निकृष्ट असल्याचे बोलले जाते. एअरव्हॉल्व्ह नाहीत म्हणून पाईपलाईन फुटत आहे, अशी ओरड होती. म्हणून शहरामध्ये ५० ठिकाणी एअरव्हॉल्व्ह बसवण्यात आले; परंतु पालिकेच्या समोर एअरव्हॉल्व्हच्या जवळच पाईप फुटली आहे. या पाईप जोडलेल्या ठिकाणी गळत नाहीत तर मध्येच कुठेही फुटत आहेत. पाईपना पाण्याचे प्रेशर सहन होत नसल्याने त्या फुटत असल्याचे पालिकेच्या तज्ज्ञांचे मत आहे. जर योजनेची हायड्रोजेनिक टेस्टिंग झाली तर योजनेचा चेहराच फाटेल, अशी अवस्था होण्याची शक्यता आहे. त्यात जर क्राँक्रिटचे रस्ते झाले तर फुटलेल्या या पाईपची दुरुस्ती कशी करायची असे अनेक आणि गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे.









