रोजाचे पालन करीत संकट समयी शासन, प्रशासनाला होणारी मदत अभिमानास्पद: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ह्युमॅनिटी ग्रुप आणि खैरे ए उम्मत कमिटीतर्फे महिला रुग्णालय येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी करण्यात येणारे सामाजिक कार्य कौतुकास्पद आणि इतरांना प्रेरणादायी आहे असा गौरव जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केला. मुस्लिम समाजाचे तरुण रमजानमध्ये रोजाचे पालन करीत संकट समयी शासन आणि प्रशासनाला करीत असलेले सहकार्य पाहून समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकार्‍यांनी महिला रुग्णालयसमोर तरुणांनी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बसण्यासाठी केलेली तात्पुरती सोय, तसेच स्वच्छता, लाईट, पंखे, इत्यादी कामाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. तसेच इतर सामाजिक संस्थांनीही अशा कामात पुढे आले पाहिजे, असे आवाहन केले. याप्रसंगी  शकील मुर्तुझा,रहिम अकबर अली, नगरसेवक मुसा काजी, साहिल पठाण, ईलु खोपेकर, शकील मोडक, सिकंदर खान, इस्माईल नाकाडे, सहजाद ईब्जी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आमच्या कार्याची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करून कौतुक केल्याबद्दल कमिटीचे अध्यक्ष शकील मुर्तुजा यांनी विशेष आभार मानले. दरम्यान मिरकरवाडा येथे तातडीने मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले. तसेच सामाजिक कार्य करणार्‍या सर्वांना ओळख पत्र ही दिले जातील असे, आश्‍वासनही दिले.