बहुजन विकास आघाडीची तहसील प्रशासनाकडे मागणी
रत्नागिरी:- रेशनकार्डवरील नाव कमी करणे किंवा समाविष्ट करण्यासाठी सायंकाळी एक तासाची वेळ ठेवण्याचा निर्णय तहसिल प्रशासनाने घेतला आहे; मात्र ही वेळ नागरिकांसाठी गैरसोयीची असल्यामुळे त्यात बदल करावा, अशी मागणी बहूजन विकास आघाडीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली.
हे निवेदन बविआचे तानाजी कुळये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तहसिल प्रशासनाला दिले. उत्पन्नाचा, जातीचा, नॉन क्रिमीलयर दाखला काढण्यासाठी रेशनकार्ड हा महत्वाचा भाग बनला आहे. रेशनकार्डावरील धान्य यासाठी रेशनकार्ड महत्वाचे असते; परंतु नाव कमी वा दाखल करण्यासाठी पुरवठा विभाग एक महिना रेशनकार्ड आपल्या ताब्यात ठेवते. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन कामासाठी ते उपलब्ध होत नाही. अनेक ग्रामस्थ रेशनकार्डामध्ये नाव समाविष्ठ करणे नाव कमी करणे यासाठी तालुक्याचा ग्रामीण भागातून ये-जा करत असतात. एका फेरीत कामे होत नाहीत. यामध्ये नागरिकांचे आर्थिक नुकसान होते आणि वेळही वाया जातो. प्रशासनाचे स्थानिक पातळीवरील होणारे निर्णय ग्रामस्थांचे आर्थिक व शरिरीक पिळवणूक करणारे आहेत. तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीमधील सुमारे 200 गावांसाठी व शहरासाठी आता फक्त आठवडयातून एकच मंगळवार ठेवण्यात आला आहे. एकच दिवस असल्याने तालुक्यातून मोठी गर्दी होते.
तहसिलदार यांनी 27 पासून सायंकाळी 5 ते 6 या वेळेत नाव कमी करणे व समाविष्ठ करण्यासाठी वेळ दिला आहे. या वेळेत नाणिज, जयगड, पूर्णगड, डोर्ले आदी लांब पल्यांच्या गावांसाठी वाहनांची व्यवस्था काय आहे. याचा प्रशासनाने विचार करावा. रेशनकार्डसाठी नागरिकांना दिवसभर थांबून रात्री-अपरात्री घरी परतावे लागते. कोरोना काळात मेटाकुटीला आलेल्या ग्रामस्थांची चेष्टा प्रशासनाने थांबवावी आणि ही वेळ सकाळी 10 ते 12 अशी ठेवावी. प्रशासनातील कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहात. लोकशाहीत जनता ही मालक आहे. त्यामुळे मालकांची होणारी परवड थांबवा व योग्य न्याय द्या. अन्यथा त्यांच्या संविधानिक न्याय्य हक्कांसाठी जनआंदोलन उभारावे लागेल हे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात येत आहे.