रत्नागिरी:- सणासुदीच्या दरम्यान रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांकडून रिक्षा चालक जादा भाडे दर आकारतात अशा तक्रारी आरटीओ कार्यालयाकडे गेल्या होत्या. या नंतर याठिकाणी 10 दिवस कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत तब्बल 60 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी दिली.
मुळात कोकण रेल्वेने गणेशोत्सव, दिवाळी, शिमगा आणि इतर महत्वाच्या सण उत्सवादरम्यान लाखों चाकरमानी रत्नागिरीत दाखल होत असतात. रेल्वेचे तिकिट कमी आणि रत्नागिरीत आल्यावर रिक्षा भाडे अधिक अशी तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून आहे. रेल्वेस्टेशनच्या रिक्षाचालकांना आरटीओ आणि पोलीस विभागाकडून अनेक वेळा सूचना देवूनही याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली नाही. मात्र यंदा होळी सणाच्या आधीपासूनच रत्नागिरी आरटीओ कार्यालयाकडून 10 दिवस कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. या दिवसात प्रवाज्ञि बसल्यावर मीटर बंद ठेवणे, इतर कागदपत्रांची पूर्तता नसणे, जादा भाडेदर आदी 60 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ठरलेल्या नियमानुसार भाडेदर आकारणी करावी असे आवाहन आरटीओ जयंत चव्हाण यांनी केली होती, तरीदेखील या घटना होळी सणाच्या घडल्याने आणि प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेवून ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. जेणेकरुन यापुढे कोणत्याही प्रवाशाची रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आल्यानंतर त्यांच्या घरी व इतर ठिकाणी पोहचण्यासाठी गैरसोय होणार नाही, असा विश्वास या मोहिमेनंतर सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी व्यक्त केला आहे. ही मोहिम सुरु झाली तेव्हापासून 24 तास आरटीओ कर्मचारी आणि अधिकार्यांची रेल्वे स्टेशन येथे तपासणी सुरु होता. या 10 दिवसात चांगली जनजागृतीही करण्यात आली.