खेडमधील अंजणी-आष्टी ट्रॅकवरची घटना
खेड:- खेड तालुक्यातील अंजणी ते आष्टी दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत पडलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १२.२३ वाजताच्या सुमारास अंजणी ते आष्टी दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर एक तरुण जखमी अवस्थेत असल्याचे तेथे काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने १०८ ॲम्बुलन्सच्या मदतीने त्याला कळंबणी-खेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मयत तरुणाची ओळख बिरेन्द्र उंराव (वय २५ वर्षे, रा. ग्राम-जैरा, पो. सकरौली, ता. सिसई, जि. गुमला, झारखंड) अशी पटली आहे.
या अपघाती मृत्यूची नोंद खेड पोलीस ठाण्यात अमृ. क्र. १२१/२०२५, भारतीय न्याय (द्वितीय) संहिता १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅकवर हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.









