रत्नागिरी:- परतीच्या पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने येथील रेल्वेस्थानक सुशोभिकरण व नूतनीकरणाच्या कामास रविवारी सायंकाळी जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वेस्थानकाच्या छताचे पीओपी शिटस् ठिकठिकाणी कोसळले. सिलींगचे तुकडे वाऱ्याबरोबर खाली कोसळत असल्याचे पाहून उपस्थितांची पळापळ उडाली. प्रवाशांनी सुरक्षित अंतरावर जाणे पसंत केले. सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्याने ही घटना घडली.
रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्यात आहे. रविवारी सायंकाळी रेल्वे स्थानकात नेहमीप्रमाणे प्रवासी वर्गाची गर्दी होती. यावेळी झालेला जोरदार पाऊस आणि वारा तसेच विजांचा कडकडाट अशा वादळी वातावरणाचा सुशोभिकरणाच्या कामाला फटका बसला. छताला लावलेले आकर्षक पीओपीचे मोठे तुकडे वाऱ्याच्या वेगाबरोबर खाली लोंबकळू व कोसळू लागले. हे दृश्य पाहताच रेल्वेस्थानकावर असलेल्या प्रवासीवर्गात खळबळ उडाली. साऱ्यांनीच त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर राहणे पसंत केले. जेथे छताचा भाग कोसळत होता तो भाग मुळातच प्रवाशांना ये-जा करण्यास अद्याप खुला करण्यात आलेला नाही. तरीसुद्धा या धोकादायक भागात कुणी जाणार नाही याची दक्षता रेल्वे प्रशासनाकडून घेतली जात होती.









