रेल्वेसोबतचा करार संपुष्टात; रत्नागिरी गॅस प्रकल्पातील वीज निर्मिती बंद

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील अंजनवेल-दाभोळ येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाचा रेल्वे जवळचा वीज खरेदी करार संपुष्टात आल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासून वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता, मनुष्यबळ विभाग प्रमुख फिलीप यांच्यासह प्रमुख अधिकारी पॉवर ब्लॉकमध्ये उपस्थित होते. हा प्रकल्प पुन्हा सुरु होण्यासाठी आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद हवेत, असे आवाहन यावेळी सामंता यांनी केले. त्यावेळी उपस्थित सर्वजण भावनाविवश झाले.

दरम्यान, प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी कंपनीच्या वतीने केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. परंतु येथील वीजनिर्मितीसाठी आवश्यक नैसर्गिक वायू किफायतशीर दरात उपलब्ध होईपर्यंत ते अशक्य आहे. सध्याच्या परिस्थितीत पुढील एक महिन्यासाठी वीजेची मागणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी जॉन फिलिप्स यांनी दिली.

आरजीपीपीएल कंपनीला वीज निर्मितीसाठी नेहमीच तारेवरील कसरत करावी लागत होती. केंद्र सरकारने अनुदान दिल्याने रेल्वेसाठी ५०० मेगावॅट वीजनिर्मितीचा करार करून कंपनी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. १ एप्रिल २०१७ पासून ते मार्च २०२२पर्यंत पाच वर्षां करता हा करार करण्यात आला होता. परंतु मध्यंतरीच्या काळात नैसर्गिक वायूवरील अनुदान बंद केल्याने वीजनिर्मिती महागडी झाली. परिणामी रेल्वे कडील विजेची मागणी कमी करण्यात आली होती. शेवटच्या टप्प्यात तर दिवसाला मागणीनुसार फक्त २५० ते ३०० मेगावॅट वीज निर्मिती केली जात होती. हा करार संपुष्टात आल्यानंतर कमी दरामध्ये वीजनिर्मिती होत नसल्याने कोणताही नवीन वीज खरेदीचा करार झालेला नाही.

वीज खरेदीचा नवीन करार नसल्याने आरजीपीपीएलच्या यूपीएल कंपनीने दोन महिन्यापूर्वी कंपनीतील ७५ कामगारांना कमी केले होते,त्यानंतर कंपनीतील सी एम आर या ठेकेदार कंपनीचा कामाचा ठेका ३१ मार्चपर्यंत होता. परिणामी १ एप्रिलपासून १८५ जणांना कामावर न येण्याची सूचना देण्यात आली. हळूहळू ही संख्या वाढणार आहे. कंपनी कायमची बंद पडली तर सुमारे साडेचार हजार कामगारांवर बेकारीची आपत्ती येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ या विषयात लक्ष घालावे, असा इशारा यापूर्वी आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळ अधिवेशनात दिला होता.

कोकण एलएनजीवरही परिणाम होणार

बेरोजगारीसोबत कंपनी बंद पडल्याचा फटका कोकण एलएनजीलाही बसणार आहे. मुळात दाभोळ वीज प्रकल्प उभा रहातानाच वीज निर्मिती, परदेशातून गॅस आयात करणे, रिगॅसीफिकेशन आणि पाईपद्वारे गॅस वहातूक असे चार प्रकल्प एकाच कंपनीत अंतर्भूत होते. त्यामुळे या चार स्वतंत्र युनिटची बांधणी, आरेखन, तांत्रिक बाबी एकमेकाला संलग्न आहेत. वीज निर्मिती प्रकल्पातून बाहेर पडणारम्य़ा गरम पाण्याचा वापर द्रवरुप वायुचेचे वायुत रुपांतर करण्यासाठी केला जातो. तर रिगॅसीफिकेशन प्रकल्पातील वायू इंधन म्हणून वीजनिर्मितीसाठी वापरता येतो.

पाच वर्षांंपूर्वी कर्जाच्या डोंगरातून आरजीपीपीएलला बाहेर काढताना गॅसचे युनिट स्वतंत्र करुन कोकण एलएनजी या कंपनीची निर्मिती झाली. कागदावर ही कंपनी स्वतंत्र असली तरी रिगॅसीफिकेशनसाठी आवश्यक गरम पाणी आरजीपीपीएलमधूनच मिळत होते. परंतू आता वीज उत्पादन बंद झाल्याने हे गरम पाणी कोकण एलएनजीला मिळणार नाही. साधारणपणे सप्टेंबर ते मे या कालावधीत. नैसर्गिक वायूची वाहतूक करणारी सर्वाधिक जहाजे कोकण एलएनजीच्या जेटीवर येतात. यामधील द्रवरुप वायूचे वायु रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला फटका बसणार आहे.