रुणच्या जंगलमय भागात सापडला सडलेला मृतदेह

लांजा:- तालुक्यातील रुण येथील जंगलमय भागात एका ५० वर्षीय अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. रुण येथील जंगलमय भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने काहीतरी कुजलेले असल्याची कुणकूण स्थानिक ग्रामस्थांना लागली होती. त्यानुसार याबाबत लांजा पोलिसांना माहिती देण्यात आली.

लांजा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील चवेकर, हेड. काँ. अरविंद कांबळे, राजेंद्र कांबळे, कॉन्स्टेबल प्रथमेश वारिक आदींनी घटनास्थळी जावून शोध घेण्याचे काम केले. मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जंगलमय भागात जावून पोलिसांनी नेमके काय कुजलेले आहे याचा शोध घेतला असता एका ५० वर्षीय मानवी पुरुष जातीचा मृतदेह आढळला. लांजा शहरात फिरणाऱ्या ५० वर्षीय वेडसर व्यक्तीचा तो मृतदेह असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्या व्यक्तीची ओळख न पटल्याने ओळख पटविण्यासाठी तिच्या नातेवाईकांना लांजा पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.