रुग्णवाहिकेत जन्मलेल्या जुळ्या मुलांचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

लांजा:- १०८ रुग्णवाहिकेमध्ये जन्माला आलेल्या लांजा तालुक्यातील कुवे गावातील त्या जुळ्या बालकांचा अखेर पाचव्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू  झाला. 

लांजा ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात योग्य आणि तातडीने उपचार न मिळाल्यामुळे व त्यांच्या गलथान कारभारामुळेच ही दुर्दैवी वेळ ओढवली असल्याचा थेट आरोप वारेशी कुटुंबीयांनी केला आहे.याबाबत बोलताना वारेशी कुटुंबीयांच्या वतीने भास्कर वारेशी यांचे चुलते लक्ष्मण वारेशी यांनी सांगितले की, आपल्या पुतण्याची बायको भाविका हिच्या पोटात दुखू लागल्यानंतर दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तिला लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र या ठिकाणी कोणतीच सोयीसुविधा नसल्याने थातूरमातूर उपचार करून भाविका हिला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेने तीला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र या ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध झाले नाहीत. या ठिकाणी असलेल्या सिस्टर यांनी डॉक्टर उपलब्ध नाहीत. तसेच बाळांना ठेवण्यासाठी साधन नाही. तुम्ही त्यांना घेऊन कोल्हापूरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये जा तेही तुमच्या जबाबदारीवर असे सांगण्यात आले.

त्या परिस्थितीत कोल्हापूरला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे आपल्याला डेरवण येथे जाण्याचा सल्ला दिला. यामध्ये दिड तास वेळ वाया गेला होता.यानंतर आपण आपली सून भाविका हिला घेऊन 108 रुग्णवाहिकेने डेरवण येथे चाललो होतो. मात्र वाटेतच तिची डिलिव्हरी होऊन तिने दोन मुलांना जन्म दिला होता. मात्र या दरम्यान भाविका हिची मोठ्या प्रमाणात अबाळ झाली.

आणि यातूनच या दोन्ही बालकांचा सोमवारी १४ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. कारण या ठिकाणी डिलिव्हरी झाली असती तर कदाचित आमची दोन्ही मुले सुखरूप जन्माला येऊन त्यांचे प्राण वाचले असते असे लक्ष्मण वारेशी यांनी सांगितले.याबाबत बोलताना येथील माजी नगरसेवक मुरलीधर निवळे यांनी सांगितले की या संपूर्ण प्रकाराला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय जबाबदार आहे. प्रसूतीसारखी शस्त्रक्रिया जर जिल्हा शासकीय रुग्णालयात होत नसेल आणि त्या ठिकाणी डॉक्टर नर्स किंवा अन्य सेवा सुविधा उपलब्ध होत नसतील तर यासारखे दुर्दैवाची गोष्ट नाही.