रत्नागिरी:- तालुक्यातील रिळ येथील प्रगतीशील शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांचे मेढवण येथे झालेल्या अपघातामध्ये निधन झाले . मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण कार अपघातात गुरुवारी वैद्य यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तीव्र वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला.

चालक मिलिंद वैद्य (वय ४३), हर्षद गोडबोले ( वय ४२) आणि आनंदी गोडबोले (वय ५) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातग्रस्त गुजरातवरून पुण्याला परतत होते. वैद्य त्याचे नातेवाईक गोडबोले कुटुंबासह गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत होते. मेंढवण येथील तीव्र वळणावर चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी दुभाजकावर आदळली. चालक मिलिंद वैद्य आणि हर्षद गोडबोले यांचा जागी मृत्यू झाला, तर आनंदी गोडबोले हिचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अपघातात हर्षदा हर्षद गोडबोले (वय ३७) या गंभीर जखमी झाल्या असून लहानगा अद्वेत गोडबोले (वय १२) हा किरकोळ जखमी झाला आहे.
रिळचे सरपंच मिलिंद वैद्य हे फिरण्यासाठी गुजरातला गेले होते. वैद्य यांच्या अपघाती निधनामुळे कृषी क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.