रिफायनरीला विरोध राज्य सरकारला बदनाम करण्याचे नाटक: आनंदराव अडसूळ

रत्नागिरी:- राजापूर बारसू रिफायनरी प्रकल्पाला सुरु असलेला विरोध हे राज्य सरकारला बदनाम करण्याचे नाटक विरोधक करत आहेत, अशी टिका माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी रत्नागिरीत केली. 6 मे रोजीचा उध्दव ठाकरे यांचा दौरा त्याचाच एक भाग असल्याचे सांगतानाच रिफायनरीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.

ते शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, बारसू प्रकल्प परिसरातील जमिनी 238 परराज्यातील लोकांनी खरेदी केल्या आहेत. जमीन खरेदी केलेल्यांनी अद्यापपर्यंत बारसू प्रकल्पासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

प्रकल्पासंदर्भातील वस्तुस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील राज्य शासनाची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. स्थानिक नागरिक, शेतकरी, जमीनमालक, आंदोलक यांना विश्वासात घेण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. उद्योगमंत्र्यानी शेतकर्‍यांना विश्वासात घेतल्यानंतर प्रकल्पविरोधी आंदोलनाची धार निश्चितपणे कमी होईल. हे सगळे महाविकास आघाडीचे नेते करत आहेत.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ते म्हणाले, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशीच माझी अपेक्षा आहे. पवार नेमक्या कोणत्या पक्षातून मुख्यमंत्री होतील हे आताच सांगणे कठीण आहे. ते सोबत आले तरीही मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहिल. मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने गेल्या 9 महिन्यात अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. रस्ते, पुलांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण डिसेंबर 2023 पर्यंत निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास अडसूळ यांनी व्यक्त केला. तसेच सहकार विभागामार्फत पतसंस्थांना परवाने दिले जातात. याबाबत सहकार विभागाची भूमिका अनेकदा संशयास्पद ठरली असून कार्यपद्धतीबाबत वारंवार आक्षेप घेतले जात असल्याचे श्री. अडसूळ यांनी सांगितले.

बाजार समितीमधील निकाल क्लेशदायक

संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. शिवसेनेला अत्यल्प जागा मिळाल्या असून ते क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया श्री.अडसूळ यांनी व्यक्त केली. सहकार क्षेत्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकीय वर्चस्व हळूहळू कमी करण्यासाठी भविष्यात केले जातील अशी माहिती माजी खासदार अडसूळ यांनी केली.