मीटर बंद ठेवून अवाजवी भाडे आकारणाऱ्या १३ रिक्षा चालकांवर कारवाई
रत्नागिरी:- मीटर बंद ठेवून अवाजवी भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शनिवारी अशा पद्धतीने वाहतूक करणाऱ्या 13 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. पुढील काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून वाहतूक शाखेच्या या कारवाईचे शहरवासीयांनी कौतुक केले आहे.
शहरात अनेक रिक्षांचे मीटर बंद असल्याचे आढळून येत असून रिक्षा चालक मनमानी पद्धतीने भाडे आकारात असल्याच्या तक्रारी प्रवासी करीत आहेत. केवळ वाद नको म्हणून प्रवासी याकडे कानाडोळा करतात. मात्र याचा गैरफायदा घेत अनेक रिक्षाचालक बेसुमार पद्धतीने भाडे आकारून प्रवाशांची लुटमार करीत आहेत. रेल्वे स्टेशन वरून रत्नागिरीत येण्यासाठी १७० ते २०० रुपये भाडे आकारण्यात येत आहे. दर निश्चित नाहीत, टेरिफ बनलेले नाही अशी उडवाउडवीची उत्तरे रिक्षा चालकांकडून दिली जातात. केवळ नाईलाज म्हणून सर्वसामान्य लोक रिक्षा चालकांसोबत वाद घालत नाही. एका रिक्षावाल्याला नकार दिल्यास दुसरा रिक्षावाला देखील भाडे स्वीकारण्यास नकार देतो. एक प्रकारे रिक्षा थांब्यावर रिक्षा चालक संगनमत करून भाड्याची आकारणी करतात. अनेकदा रेल्वे स्टेशन स्टॉप ते रेल्वे स्टेशन फाटा हे भाडे नाकारले जाते किंवा अवास्तव भाडे आकारून प्रवाशांची पिळवणूक केली जाते.
अनेक रिक्षा चालक आपल्या गणवेशावर देखील नसल्याचे दिसून येते. या होणाऱ्या लुटीमुळे प्रवासीवर्ग हैराण झाला असून याबाबत अनेकांनी वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत बंद मीटर असलेल्या १३ रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवाजवी पद्धतीने भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर देखील आता कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे. याशिवाय रिक्षा थांब्यावर प्रमाणापेक्षा अधिक रिक्षा उभ्या असतात यामुळे अनेकदा ट्रॅफीक जाम होण्याचे प्रमाण वाढते. या बाबी देखील वाहतूक पोलिसांनी नियंत्रणात आणाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.