राष्ट्रीय पेयजलचा नऊ कोटीचा निधी योजनांवर खर्ची टाका 

रत्नागिरी:- राष्ट्रीय पेयजल योजनेतील नऊ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे शिल्लक आहे. तो शासनाकडे वर्ग करण्यापेक्षा सध्या कामे सुरु असलेल्या योजनांवर खर्च करा अशा सुचना जिल्हा परिषद सदस्यांनी जलव्यवस्थापन समितीत केल्या.

रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नुकतीच पार पडली. यावेळी सर्व सभापती, अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. प्रशासन किती निधी देणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रीय पेयजलमधील नऊ कोटी रुपयांचा निधी अजुनही शिल्लक आहे. तो निधी शासनाकडे वर्ग करा अशा सुचना प्राप्त झाल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या कामांसाठी जलजीवन मिशनमधून पेयजलच्या कामांना निधी देऊ असे सुचित केले आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांनी हा निधी वर्ग करण्यापेक्षा सध्या सुरु असलेल्या कामांवर खर्च करा अशी सुचना करा. जलजीवन मिशनमधून निधी येईल तेव्हा येईल, सध्या उपलब्ध निधीतून कामे पूर्ण झाली तर त्याचा फायदा ग्रामस्थांना होईल. पेयजलमधून अनेक योजनांची कामे सुरु आहेत. निधी परत पाठवला तर ती कामे थांबती. मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त खर्च करण्याच्या सुचना यावेळी पदाधिकार्‍यांनी पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहे. दरम्यान, जलजीवन मिशनचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शासनाने हा आराखडा मंजुरीसाठी समित्या तयार केल्या आहेत. त्याचे अध्यक्ष पालकमंत्री आहेत. त्यांच्या सुचना नुसार पुढील कार्यवाही होणार आहे.