रत्नागिरी:- जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरुच असल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोर झाल्याने जगबुडी नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु झाली आहे. तसेच संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता चिपळूण शहरात राष्ट्रीय आपत्ती दलाची तुकडी दाखल झाले आहे. जिल्ह्यात केल्या २४ तासात मंडणगड तालुक्यात १५७.०० मिमि एवढा पाऊस जास्त पडला आहे. तर सर्वात कमी पाऊस पडल्याची नोंद संगमेश्वर तालुक्यात करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील खेड, चिपळूण तसेच राजापूर तालुक्याच्या ठीकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जगबुडी नदी इशारा पातळीकडे जात असल्याने खेड व चिपळूण भागात पुराचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेता. चिपळूण येथे राष्ट्रीय आपत्ती दलाची एक तुकडी दाखल झाली आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी जिल्ह्यातील सर्वच आपत्ती व्यवस्थापन कक्षांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी सिंग यांनी याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लांजा व राजापूर येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षांची पहाणी केली. तर राष्ट्रीय महामार्गावर सुरु असलेल्या रस्ते बांधकामांमुळे होणारे अपघात लक्षात घेता रस्ते सुस्थितीत करण्याच्या सुचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत.