रत्नागिरी:- स्वत:ला काय मिळते हे पाहणारे कार्यकर्तेच लोकप्रतिनिधींना चिकटून असतात. जिल्ह्यात ज्या ठिकाणी आमदार आहे. तेथीलच कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षातून बाजूला झाले. जिल्ह्यात अन्य ठिकाणचे कार्यकर्ते पक्षासोबत कायम आहेत. उगवत्या सुर्याला नमस्कार करणारे बाजूला गेले असतील तरीही पक्ष कसा वाढवायचा हे आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. वर्षभरात पक्ष पुन्हा जिल्ह्यात नक्कीच उभारी घेईल. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यावर भर द्यावा. त्यातूनच पक्ष उभा राहत असल्याचे प्रतिपादन चिपळूणचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते रमेशभाई कदम यांनी केले.
रत्नागिरीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक पदाधिकार्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना पक्षातील वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यात पक्षाची सध्यस्थिती झाल्याचे सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांचा मेळावा बुधवारी साईमंगल कार्यालय येथे सपंन्न झाला. पक्षाचे जिल्हा निरिक्षक शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मेळाव्यात पक्षाचे नेते तथा चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम, जि.प.चे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, बशिर मुतुर्झा, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, माजी जि.प. सदस्य रामभाऊ गराटे, दिलीप माटे, शहराध्यक्ष निलेश भोसले, माजी महिला जिल्हाध्यक्षा सौ.धनश्री मोरे, माजी तालुकाध्यक्ष बबलु कोतवडेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रमेशभाई कदम म्हणाले, आपल्याला कोणावर टिका करायची नाही. आता आपल्याला आपला पक्ष अधिक बळकट करायचा आहे. हे लक्षात घेवून कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी कामाला लागले पाहिजे, काही जण माझ्याकडे आले होते. पुढे निवडणूका आहेत. पहिल्यांदा जिल्हा परिषद आहेत. त्यानंतर पालिका निवडणूका होतील. लोकसभा, विधानसभेच्या निवडणूका वर्षभराने होणार आहेत. आपण असे करु, तसे करु सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र मी पक्षाचे नेते शरदराव पवार यांच्या सोबत होतो, यापुढेही राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. पक्षात राहून उलट -सुलट धंदे करणे आपल्याला जमत नसल्याचे मी स्पष्टपणे सांगितल्याचे श्री.कदम यांनी सांगितले.
पक्ष उभा कसा करायचा हे मला कोणी सांगण्याची गरज नाही. यापुर्वी मीच सर्वांना सोबत घेवून पक्ष बांधला होता. आताही निष्ठावान कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. हिच पक्षाची खरी ताकद असल्याचे श्री.कदम यांनी सांगितले.कार्यकर्त्यांनी आता जनतेमध्ये मिसळूण त्यांच्या अडीअडचणींना त्यांना मदत केली पाहिजे, रास्ते पाकाड्या करुन मते मिळत नाहीत. तर जनतेची वैयक्तिक कामे करुन मते मिळतात असेही श्री.कदम यांनी सांगितले.
पक्ष निरिक्षक शेखर माने यांनी बोलताना रत्नागिरीतील पदाधिकार्यांवर अन्याय झाल्याचे मान्य करत अशी चूक पुन्हा होणार नाही असे सांगितले. पक्षाचे दोन भाग झाले असले तरी निष्ठावान कार्यकर्ते आपल्याकडेच आहेत. त्यामुळे त्यांच्या साथीने आपण पक्ष पुन्हा उभा करु, पक्ष पुन्हा उभा करणे पक्षाला नवीन नाही. खासदार, आमदार करणारी फॅक्टरीच आपल्याकडे असल्याचे श्री.माने यांनी सांगितले. बाजूला गेले त्यांनी बंड का केले ? हे अध्याप कोणालाच काही समजले नाही. ज्यांनी बोगस उद्योग केले असतील तेच ईडीच्या भितीने बाजूला झाल्याचा आरोप श्री.माने यांनी केला.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्षा सौ. धनश्री मोरे यांनी आपल्या मनोगतात रत्नागिरी जिल्ह्यावर पक्षाकडून कसा अन्याय करण्यात आला हे सांगितले. येथील सर्वसामान्य कार्यकर्त्यांला उभारी देण्यासाठी पक्षातील नेत्यांनी काय केले हे सांगावे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. धनश्री मोरे यांनी थेट पक्ष निरिक्षकांवर हल्ला केला. असे निरिक्षक येतात जातात. त्यांने पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना काही फरक पडत नाही. तुम्ही पक्ष बांधणीसाठी काय करता हे महत्वाचे असल्याचे सौ.मोरे यांनी सांगितले.