रत्नागिरी:- राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर जोरदार नाराजी नाट्य उफाळुन आले आहे. रत्नागिरीत राष्ट्रवादीमध्ये पुन्ही उभी फुट पडण्याची शक्यता आहे. अडचणीच्यावेळी एकहाती पक्ष सांभाळला तरी पक्षाने आपला विचार केला नाही. त्यामुळे आपण नाराज असून वेगळा विचार करण्याचे समर्थकांचे मत आहे. पक्षाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर गंभीर निर्णय घ्यावा लागले, असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी दिला. परंतु जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी नाराजीबाबत खंडण केले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली भुमिका असल्याचे सांगितले.
जिल्हाध्यक्ष म्हणून सुदेश मयेकर यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती दिली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच नियुक्तीपत्र त्यांच्याहस्ते मयेकर यांना दिले. निवड झाल्यानंतर सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीतील ज्येष्ठांच्या गाटीभेटी घेऊन त्यांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन घेतले. तसेच विविध कार्यक्रमांचा त्यांनी सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यक्रमातही ते पुढे होते. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढविण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. गेली नगराध्यक्ष पोटनिवडणुक असो वा विधानसभा निवडणुक असो, त्यांनी पक्ष अडचणीत असताना त्या निवडणुका लढण्याचा धाडस दाखवले होते. जिल्हाध्यक्ष पदासाठी कुमार शेट्ये देखील इच्छुक होते. परंतु त्याना बाजुला करून सुदेश मयेकर यांची जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड शेट्ये यांच्या जिव्हारी लागली आहे.
कुमार शेट्ये देखील शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्ये म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांनी पक्षाला उभारी आणि बळ देण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरीत स्वखर्चाने पक्षाचे कार्यालय त्यांनी चालवून पक्ष बांधणीचे काम केले. राष्ट्रवादीत उभी फुट पडली तरी रत्नागिरीत त्यांनी पक्ष बांधुन ठेवण्याची महत्त्वाची भुमिका बजावली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून ते इच्छुक होते. मात्र सुदेश मयेकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे ते प्रचंड नाराज आहे. याबाबत त्यांचीशी चर्चा केली असता ते म्हणाले, आपण पक्षाच्या निर्णयावर नाराज आहोत. आता सर्व समर्थकांचे मत आहे, की आपण वेगळा विचार करायला हवा. परंतु मी वेट अॅण्ड वॉचच्या भुमिकेत आहे. पक्षाने याची दखल घेतली नाही, तर कार्यकर्त्यांना घेऊन गंभीर निर्णय घ्यावा लागले, असा इशारा त्यांनी दिला.
सर्वांना घेऊन पक्षाची बांधणी करणार : सुदेश मयेकर
याबाबत जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्षात फुट पडण्याची कोणताही शक्यता नाही. पक्षाने अधिकृपणे माझी नियुक्ती केली आहे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत आहे. मी आजच कुमार शेट्ये यांच्याशी चर्चा केली. लवकरच त्यांच्याबरोबर मी जिल्हा दौरा करणार आहे. जे निष्ठावंत आहेत त्यांना घेऊन पक्षाची बांधणी करणार. आता रडत बसणार नाही.