राजाभाऊ लिमये ; बंडखोरी करणारे पक्ष संपवायला बसलेत
रत्नागिरी:- पक्षात फूट पाडणाऱ्यांचा बंदोबस्त करा, हे कुमार शेट्येंचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. रत्नागिरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय कुमार शेट्येंनी बंद केले. आता स्वतःचे कार्यालय काढून दुसऱ्या पक्षातून आलेले दोन, चार पदाधिकारी बरोबर घेऊन पक्षातील पदाधिकाऱ्यांबद्दल कट कारस्थान सुरू आहे. पक्षात फूट पाडणे आणि बंडखोरी करणे यांची पूर्वापार सवय आहे. पक्षामध्ये फाटाफूट पाडण्याचे काम करणाऱ्या कुमार शेट्येंना पक्षहितासाठी पक्षातून काढून टाका, अशी मागणी पक्षात जोर धरू लागली आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, प्रांतीक सदस्य बशीरभाई मुर्तुझा, पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी दिली.
रत्नागिरी तालुका आणि शहरातील पक्षसंघटनांतर्गत कुमार शेट्ये यांचा पोरखेळ सुरू आहे. पक्षात फूट पाडणे, बंडखोरी करणे यांची पूर्वापार सवय आहे आणि ते सर्व रत्नागिरीतील जनतेला ज्ञात आहे आहे. रवींद्र उर्फ भाऊ सुर्वे ज्या वेळी विधानसभेला उभे राहिले त्या वेळी कुमार शेट्येंनी सभापती असताना पक्षाच्या विरोधात बंडोखोरी केली. २०१४ ला बशीर मुर्तुझा विधानसभेला उभे राहिले होते, त्या वेळीसुद्धा पक्षाच्या विरोधात काम केले. त्यानंतर २०१६ ला उमेश शेट्ये नगराध्यक्षपदासाठी उभे राहिले, त्या वेळीही पक्षाच्या विरोधात काम केले. असा हा माणूस पक्ष संपवायला बसला आहे, असे लिमये, मुर्तुझा, मयेकर यांनी सांगितले.
कुमार शेट्ये यांनी आता मार्गदर्शन करायचे सोडून प्रदेश कार्यालयामध्ये फेऱ्या मारून याला काढा त्याला काढा, अशा नको त्या उचापती सुरू आहेत. पक्षाच्या नावाने कार्यालय काढायचे आणि काहीजणांना बरोबर घेऊन पक्षामध्ये उचापती करायच्या हेच त्यांचे दैनंदिन काम अनेक वर्षापासून सुरू आहे. पालिकेची निवडणूक ही विधानसभा लढवलेले उमेदवार आणि शहराध्यक्ष त्याचबरोबर तालुकाध्यक्ष यांना बरोबर घेऊन पालिका निवडणुकीचे धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. असे असताना अन्य पदाधिकारी यांची नावे टाकून पक्षामध्ये गटतट करून फूट पाडणारा हा म्होरक्या कोण आहे तो सर्वांना माहिती आहे. रत्नागिरीतील सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमच्याशी फोनवरून संपर्क करून आणि प्रत्यक्ष भेटले. पक्षात हे नेमके काय चालले आहे. पक्षामध्ये फाटाफूट पाडण्याचे काम कुमार शेट्येच करीत आहेत. त्यांना ती पूर्वीपासूनची सवय असल्यामुळे पक्षहितासाठी कुमार शेट्ये यांना पक्षातून काढून टाका, अशी मागणी केल्याचे तिघांनी सांगितले.









