पाचल:- राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय रायपाटण नजीक असलेल्या गणेश कृपा हॉटेलला अचानक आग लागून संपूर्ण हॉटेल भस्मसात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली.
शॉर्ट सर्किटने हॉटेलला आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान राजापूर नगर परिषदेच्या अग्नीशामक दलाची गाडी रात्री घटनास्थळी दाखल झाली आणि लागलेली आग विझविण्यात आली. मात्र आगीत गोडेकर यांचे हॉटेलचे सर्व साहित्य भस्मसात झाले.
सदानंद महादेव गोडेकर हे हॉटेल असून ते सायंकाळी काही निमित्त पाचलला गेले होते. नेमकी त्या दरम्यान आग लागली होती. हॉटेल बंद असल्याने कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र हॉटेल मालक गोडेकर
पाचल येथून परत आले असता त्यांना हॉटेलमधून धूर येत असल्याचे दिसला आणि त्यांनी तात्काळ हॉटेलचा दरवाजा उघडला असता आतमध्ये मोठी आग लागल्याचे आढळून आले.
दरम्यान आजूबाजूची मंडळी देखील धावून आली. आग विझवायला सुरवात झाली. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीत गोडेकर यांचे सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी आणलेले किराणा सामान, औषधे, अंथरूण, कपडे व अन्य साहित्य यांचा समावेश होता. ते त्याच हॉटेल मधील छोट्या जागेत रहात होते. मदतीसाठी धावून आलेल्या ग्रामस्थांनी हॉटेलमधील एक भरलेला आणि दोन रिकामे सिलेंडर तात्काळ बाहेर काढले. त्यामुळे पुढील धोका टळला. आगीत नेमके किती नुकसान झाले ते समजू शकले नाही. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात आले. घटनेची खबर कळताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील पोलीस कर्मचारी रामदास पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा राजापूर नगर परिषदेच्या अग्नीशामक दलाची गाडी घटनास्थळी पोचली होती.









