चिपळूण:- चिपळूणच्या दिशेने होणारी खैराची अवैध वाहतूक रायगड जिल्ह्यातील पोलादपूर वनउपज नाक्यावर वन विभागाने शुक्रवारी रोखली. या कारवाईत वन विभागाने ८५ हजारांचे खैर लाकूड जप्त केले आहे. या खैराची वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रकचालकालाही वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
गुफरान ईरफान अहमद (रा. ऐनी हातीनसी, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. गुप्त
माहितीच्या आधारे रोहा उप वनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव, सहायक वनसंरक्षक रोहित चौबे, वनक्षेत्रपाल विकास भामरे, महाडचे वनक्षेत्रपाल राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर वनउपज तपासणी नाका येथे वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत चिपळूणच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच ०४, जेके ६७९७) मध्ये ६.८०५ घनमीटरचे ३५४ खैर सोलीव तुकडे मिळाले. याबाबत चौकशी गेली असता खैर वाहतुकीचा कोणताही परवाना चालकाकडे नव्हता. या मालाची अंदाजे किंमत ८५,२०५ रुपये इतकी आहे. वन विभागाने खैर लाकडासह ट्रक जप्त केला आहे.
या कारवाईमध्ये पोलादपूर वनपाल परिमंडळाचे वनाधिकारी बाजीराव पवार, पोलादपूर तपासणी नाका वनरक्षक जयवंत वाघमारे, गोविंद खेडकर, देवीदास त्रिभुवन, करंजे वनरक्षक नवनाथ मेटकरी, पोलादपूर वनरक्षक संदीप परदेशी, कोतवाल वनरक्षक अमोल रोकडे, देवळे वनरक्षक भीमराव गायकवाड यांनी सहभाग घेऊन धडक कारवाई केली. ज्या अर्थी इतका खैर चिपळूणकडे येत होता, त्याअर्थी चिपळुणात अजूनही भट्टया सुरू आहेत.