राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी तर उद्धव ठाकरे खुर्चीसाठी एकत्र

उद्योगमंत्री डॉ.ना. उदय सामंत यांचा रत्नागिरीत आरोप

रत्नागिरी:- मराठी भाषेच्या मुद्यावरून दोन ठाकरे एकत्र आले, परंतु त्यांच्या भाषणांमध्ये राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी तर दुसरे ठाकरे खुर्चीसाठी एकत्र आल्याचे दिसत होते. उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदीचा अहवाल स्वीकारला होता. हे ते विसरले आहेत. त्यांच्या भाषणात सरकारवर टीका करण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्यापलीकडे काहीच नव्हते. त्यांचे भाषण मराठीसाठी नव्हते, तर सत्तेच्या हव्यासापोटी होते असा आरोप शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री डॉ.ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद केला.

मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या ना. उदय सामंत यांनी वरळी येथील ठाकरे बंधूंच्या मराठी भाषा मुद्द्यावरून आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावरून आपली भूमिका मांडली. दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणे आपण ऐकली. पहिले भाषण राज ठाकरे यांचे झाले. त्यांच्या भाषणात मराठी बद्दलची आत्मीयता दिसून आली. त्यांनी आपल्या भाषणात कुठेही राजकारण आणले नाही. कोणावरही टीका केली नाही. केवळ आपली मराठी भाषा टिकली पाहिजे, तिचा आत्मसमान वाढला पाहिजे या हेतूनेच त्यांनी आपली भूमिका मांडली त्यामुळे ती खरी मराठी अस्मितेची भूमिका होती असे ना. सामंत यांनी सांगितले.

मेळाव्यातील दुसरे भाषण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे झाले.  त्यांच्या भाषणात मराठीची आत्मीयता दिसत नव्हती,  तर केवळ खुर्चीसाठी एकत्र आल्याचे दिसत होते.  उद्धव ठाकरे यांच्या  भाषणात नवीन काहीच नव्हते.  नेहमीचेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे राजकीय भाषण होते. उपस्थितांमधूनही त्यांच्या भाषणाला प्रतिसाद मिळत नव्हता.  हे स्पष्ट चित्र वरळी  डोममध्ये पाहायला मिळाले, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने  या मेळाव्याला उपस्थित राहणे टाळले.  यावरून काँग्रेस मराठी भाषेच्या विरोधात आहे का? की त्यांनाही हिंदी हवी आहे?  याचा जाब आता उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला विचारणे गरजेचे आहे.  या पुढील आंदोलन त्यांनी काँग्रेसचे विरोधात केले पाहिजे असा टोला ना. सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनीच हिंदी भाषेचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर राज्य सरकारने हिंदी ऐच्छिक ठेवली होती.  कोठेही हिंदीची सक्ती करण्यात आली नव्हती.  हिंदीला विरोध झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ऐच्छिक हिंदीचाही निर्णय मागे घेण्यात आला.  हा लोकभावनेचा आदर होता.  कोणाच्याही दबावापोटी सरकारने हा निर्णय घेतलेला नाही,  तर राजकीय संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या साह्याने मनसेचा आधार शोधण्याल्याची   टीका  ना. सामंत यांनी केली .

राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही एकत्र आलो असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यामुळे दोन भाऊ एकत्र आले असतील तर आनंदच आहे अशा शब्दात प्रतिक्रिया दिली. यातून त्यांची राजकीय परिपक्वता दिसून आली आहे. राज ठाकरे यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. त्यांनी गप्पा मारण्यासाठी वेळ दिला तर आपण केव्हाही त्यांच्या भेटीसाठी जाऊ असे ना. सामंत यांनी सांगितले.