राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘त्या’ जागेवर ‘बुद्धविहार’च होणार: ना. सामंत

रत्नागिरी:- “काही लोक निवडणुकीच्या तोंडावर समाजात गैरसमज पसरवून फूट पाडण्याचे काम करत आहेत. मात्र, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या जागेवर केवळ आणि केवळ ‘बुद्धविहार’च होणार आहे. हे बुद्धविहार देशातील सर्वात देखणे असेल,” अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित ‘थिबा राजा कालीन बुद्धविहार संबोधन सभेत’ ते बोलत होते.

यावेळी ना. उदय सामंत यांनी रत्नागिरीतील प्रस्तावित बुद्धविहाराच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर आणि विरोधकांच्या आरोपांवर सडेतोड भाष्य केले.

आपल्या भाषणात मंत्री सामंत यांनी रत्नागिरीच्या इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले, “रत्नागिरीला थिबा राजांचा मोठा इतिहास आहे. थिबा राजानेच या शहरात बुद्धविहाराची संकल्पना मांडली होती. महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्या सहकार्याने आपण या ऐतिहासिक कामासाठी १७ गुंठे जागा मंजूर करून घेतली. ही जागा राज्य उत्पादन शुल्क विभागाची असून, तिथे बुद्धविहारच उभारले जाईल.”

विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्द्यांचा समाचार घेताना सामंत म्हणाले, “निधी मंजूर करताना तांत्रिक बाबींसाठी कागदपत्रांमध्ये ‘कम्युनिटी सेंटर’ असा शब्दप्रयोग झाला असेल, पण याचा अर्थ तिथे बुद्धविहार होणार नाही असा होत नाही. नगरपालिकेचा ठराव आणि जिल्हा नियोजनाचा ठराव हे स्पष्ट करतात की तिथे बुद्धविहारच होणार आहे. जे लोक आता आंदोलन करत आहेत, त्यांना निवडणुकीपुरते राजकारण करायचे आहे. ज्यांना या जागेवर डोळा ठेवायचा आहे, त्यांचा मनसुबा मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही.”

बुद्धविहाराच्या व्यवस्थापनाबाबत पारदर्शकता ठेवण्यासाठी महत्त्वाची घोषणा करताना उदय सामंत म्हणाले, “ही जागा शासकीय आहे, त्यामुळे इथे कुणीही खासगी ट्रस्टी किंवा मालक असणार नाही. या वास्तूच्या देखरेखीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. विशेष म्हणजे, जे लोक आज विरोध करत आहेत, त्यांचे प्रतिनिधी देखील आम्ही या समितीत घेऊ. सर्वांनी मिळून हे काम करायचे आहे.”

कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर टीका करताना सामंत म्हणाले, “जे लोक पाच वर्षांतून एकदा निवडणुकीच्या निमित्ताने उगवतात, तेच आज समाजात फूट पाडत आहेत. ज्यांच्या पाठिंब्यावर काही लोक आंदोलन करत आहेत, त्या नेत्यांची नावे घेतली तर मला राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल, इतके हे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आणि गौतम बुद्धांचा अहिंसेचा संदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना मी भीक घालत नाही.”

यावेळी बोलताना त्यांनी रत्नागिरीतील इतर विकासकामांचाही उल्लेख केला. “१९५६ साली ज्या ठिकाणी रत्नागिरीत दीक्षा घेतली गेली, त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक आम्ही उभे करत आहोत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होईल. तसेच थिबा पॅलेस येथे देशातील पहिला ‘थ्री-डी मल्टिमीडिया शो’ सुरू करण्यात आला आहे, जो रत्नागिरीचा इतिहास सांगतो,” असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

शेवटी उपस्थितांना आश्वस्त करताना उदय सामंत म्हणाले, “पुढच्या एक-दीड वर्षात रत्नागिरीत देशातील सर्वात सुंदर बुद्धविहार उभे राहिलेले तुम्हाला दिसेल. हा माझा शब्द आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. हे काम पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही.”