राज्य उत्पादन शुल्ककडून तीन महिन्यात ४८४ गुन्हे; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत

रत्नागिरी:- अवैध दारूधंद्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. तीन महिन्यात ४८४ गुन्हे दाखल करून ३९५ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या कारवाईत २ कोटी २५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंदे कायमचे बंद व्हावेत यासाठी एमपीडीए ऍक्टनुसान कारवाई यापुढे केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक सागर धोमकर यांनी दिली.

जिल्ह्यात अवैध दारूधंदे आणि गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई हाती घेतली. तीन महिन्यात ४८४ गुन्हे दाखल करून ३९५ विरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत २ कोटी २५ लाख, ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ८ वाहनांचीदेखील समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण ३५ हातभट्टी हॉटस्पॉट असल्याची माहिती अधीक्षक धोमकर यांनी दिली. सर्वाधिक हॉटस्पॉट हे रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर आदी ठिकाणी असून १४ हॉअस्पॉट उद्ध्वस्त करण्यात यश आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच एकूणसाठ जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉण्ड घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

गावठी हातभट्टीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून काळ्या गुळाचा पुरवठा होत आहे. येथील गुळाच्या सप्लायरवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. काळ्या गुळाचा पुरवठा करणार्‍यांविरोधात यापुढे कारवाई केली जाणार असून गावठी हातभट्टी नष्ट करण्यासाठी एमपीडीए ऍक्टखाली गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती अधीक्षक सागर धोमकर यांनी दिली.