राजापूर येथे विहिरीत पडलेल्या गव्याची सुटका

राजापूर:- तालुक्यातील कळसवली शेवडेवाडी येथील विहिरीमध्ये गवा पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सुमारे २० फूट खोली आणि काहीशी अरूंद असलेल्या विहिरीतून गव्याला बाहेर काढणे मुश्किल झाले होते. घाबरून बिथरलेला गवा सुमारे सात-आठ फूट उंच असलेल्या विहिरीतील पाणीसाठ्यातून बाहेर पडण्याचा जोरदार प्रयत्न करत होता. वनविभागाने जेसीबीच्या मदतीने विहिरीच्या एका बाजूने बाहेर येण्यासाठी रस्ता तयार करत गव्याची सुमारे दीड-दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुटका केली.

विहिरीतून बाहेर येण्यासाठी रस्ता दिसताच त्या रस्त्याने बाहेर येत घाबरलेल्या गव्याने जंगलामध्ये धूम ठोकली. तालुक्यातील कळसवली शेवडेवाडी येथील रामचंद्र शेवडे यांच्या विहिरीमध्ये गवा पडल्याची माहिती शांताराम शेडेकर यांनी कळवसलीचे पोलिस पाटील अमित बाणे यांना दिली. राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे यांना सायंकाळी उशिरा माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती रत्नागिरीचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांना मोबाईलवरून देऊन वनविभागाची रेस्क्यू टीम घेऊन सायंकाळी ७ वा. च्या सुमारास ते घटनास्थळी दाखल झाले.विभागीय वनाधिकारी रत्नागिरी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल सुतार, वनपाल घाटगे, वनरक्षक विक्रम कुंभार, वनमजूर हरिश्‍चंद्र गुरव, वनमजूर गणेश गुरव, विजय म्हादये, दीपक म्हादये, नितीन बाणे, देवेश तळेकर यांनी गव्याला विहिरीतून बाहेर काढण्याची चोख कामगिरी बजावली.

विहिरीतून सुटका केलेला गवा नर जातीचा असून, सुमारे दीड ते दोन वर्ष वयाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. शेतीसाठी पाण्याचा वापर होत असलेल्या विहिरीमध्ये गवा पडलेला असल्याचे निदर्शनास आले. वीस-बावीस फुटाची घेर असलेली ही विहीर सुमारे वीस फूट उंच असून गवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना दिसले. मात्र, विहिरीची उंची पाहता त्यातून गवा स्वतःहून विहिरीतून बाहेर येणे मुश्किल होते. त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत विहिरीत जाण्याच्यादृष्टीने तात्पुरता मार्ग करण्यात आला. सुमारे तास-दीड तास प्रयत्न केल्यानंतर विहिरीमध्ये जाणारा रस्ता तयार झाला. विहिरीतून बाहेर येण्याच्यादृष्टीने मोकळा रस्ता दिसताच विहिरीतील पाण्यातून बाहेर उडी मारत गवा विहिरीतून बाहेर आला आणि त्याने जंगलामध्ये धूम ठोकली.