पाचल:- राजापूर तालुक्यातील येरडव बौद्धवाडी येथील संतोष धाकू जाधव (वय ५९) हे गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. 4 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ते आपल्या राहत्या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी राजापूर तालुक्यातील रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार नोंदवली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. मात्र, 7 दिवसांनंतर संतोष जाधव हे त्यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच राजापूर तालुका पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस हवालदार निलेश कात्रे आणि पोलीस हवालदार स्वप्नील घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









