राजापूर:- दीर्घकाळापासून मधुमेहाच्या (डायबेटीस) आजाराने त्रस्त असलेल्या राजापूर येथील एका तरुणाचा रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सदानंद पांचाळ (वय ३५, रा. ओणी पाचल फाटा, ता. राजापूर) हा तरुण सुमारे एक वर्षापासून ओणी येथील अशोक जाधव यांच्या घरी राहत होता. त्याला मधुमेहाचा आजार होता.
दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून राजेश पांचाळ यांना छातीत दुखू लागले आणि चक्कर येऊ लागल्यामुळे अशोक जाधव यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले आणि रात्री १०.०० वाजता दाखल केले.
सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना दाखल करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी वैभव राऊत यांनी त्यांना मयत घोषित केले.
या घटनेनंतर, दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली आणि भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.एस.) १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यू क्रमांक ५४/२०२५ अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.