राजापुरात 28 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

राजापूर:- मे महिन्यात लग्न झाले आणि नोव्हेंबर मध्ये निधन अवघ्या सहा महिन्यांचा संसार मोडून तरुणाने देवाघरची वाट धरली. ससाळे जोगलेवाडीतील केवळ 28 वर्षांचा दर्शन सहदेव जोगले याचे रविवारी सकाळी अचानक निधन झाल्याने गावभर हळहळ व्यक्त होत आहे. अल्पशा आजाराने त्याची प्राणज्योत विझताच जोगले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

इलेक्ट्रीशियनचे शिक्षण पूर्ण करून दर्शनने विद्युत वितरण कंपनीत ठेक्याच्या पद्धतीने लाईनमन म्हणून काम सुरू केले होते. केळवली विभागातील लाईनमन म्हणून तो जबाबदारीने सेवा देत होता. कष्टाने दोन भावांचे शिक्षण पूर्ण केले, कुटुंबाची आर्थिक जबाबदारीही निभावली, आणि गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तो नेहमी उत्साहाने सहभागी व्हायचा. मे महिन्यातच त्याचे लग्न झाले. आयुष्याची नवी स्वप्ने नुकतीच फुलायला सुरुवात झाली होती.

रविवारी सकाळी छातीत तीव्र वेदना जाणवल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला पुढील उपचारांसाठी राजापूर शहर रुग्णालय येथे हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत शांत झाली.

काही वर्षांपूर्वीच त्यांची विवाहित बहीण वारली होती. त्यानंतर आता दर्शनच्या निधनाने जोगले कुटुंबावर पुन्हा एकदा दु:खाचे आभाळ कोसळले आहे. गावभर त्याच्या आठवणींची चर्चा सुरू असून, घराघरांतून त्याच्या अकाली जाण्याबद्दल वेदना व्यक्त केल्या जात आहेत.