राजापूर:- तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून एका तरुण वायरमनचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत परवडी (वय २७, रा. तिथवली, ता. राजापूर) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेंडखळे येथील भवानी मंदिर परिसरात वीज वाहिनीमध्ये बिघाड झाला होता. ही दुरुस्ती करण्यासाठी अनिकेत खांबावर चढला होता. खांबावर चढण्यापूर्वी ऑपरेटरकडून संबंधित वीज वाहिनीचा प्रवाह बंद करण्यात आला होता, असे सांगण्यात येत आहे. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू असतानाच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. हा धक्का इतका तीव्र होता की, तो खांबावरून थेट खाली कोसळला.
दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनिकेत हा केवळ २७ वर्षांचा होता. त्याच्या अकाली निधनाने तिथवली आणि पेंडखळे परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी उशिरा त्याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले होते.









