राजापुरात भरवस्तीत रेडकावर बिबट्याचा हल्ला

राजापूर:- राजापूर शहर परिसरात बिबटयाचा मुक्त संचार सुरूच असून शनिवारी मध्यरात्री बिबटयाने राजीव गांधी क्रिडांगणावर म्हैसीच्या रेडकावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातारवण निर्माण झाले आहे.

यापुर्वीही बिबटयाने शहर परिसरात तीन वेळा हल्ले केले होते. त्यानंतर वनविभागाने बिबटयाचा शोध घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते. तर एका ठिकाणी पिंजराही लावला होता. मात्र त्याकडे बिबटया फिरकला देखील नव्हता. असे असताना शनिवारी पुन्हा एकदा बिबटयाने भक्ष्यासाठी मानवी वस्तीकडे मोर्चा वळविला आहे.

शहरातील भरवस्तीत रहदारीच्या मार्गावर असलेल्या वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर मध्यरात्री म्हैसीच्या रेडकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे.नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली असून जखमी रेडकाला उपचारार्थ पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले आहे.

दरम्यान बिबटयाच्या मुक्त वावरामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाने या बिबटयाचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.