राजापूर:- मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे जवाहर चौकातील एसटी वाहतुकीसह अन्य वाहतुक सुरळीत सुरू झाली असून जनजीवन पुर्वपदावर आले आहे.
सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी सकाळी मुसळधार झ्रालेल्या पावसाने राजापूर शहरासह तालुक्यात एकच दाणादाण उडविली होती. राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला व या पुराच्या पाण्याने जवाहर चौकातुन पुढे शिवस्मारकापर्यंत धडक मारली. तर शहर बाजारपेठेतही पुराचे पाणी शिरले होते. शहरातील बाजारपेठेसह छत्रपती शिवाजी महाराज रोड, बंदरधक्का, मुन्शीनाका, वरचीपेठ रस्ता पाण्याखाली गेला. याग् पुराच्या पाण्यामुळे जवाहर चौकातील अनेक टपऱ्या पाण्याखाली गेल्या, तर राजापूर शिळ गोठणेदोनिवडे मार्गावरही अर्जुनेच्या पुराचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुसळधार पाऊस आणि पुर यामुळे राजापूर शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
मात्र मंगळवारी सायंकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरू लागले. बुधवारी सकाळी तर पुराचे पाणी पुर्णपणे ओसरले व जवाहर चौकासह पाण्याखाली गेलेले रस्ते व बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला. पुराचे पाणी ओसरताच व्यापाऱ्यांकडून आपल्या दुकानांची मांडामांड करण्यात आली.
तर नगर परिषद प्रशासनाकडूनही तात्काळ बुधवारी सकाळपासूनच स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. रस्त्यांमध्ये साचलेला गाळ आणि सार्वजनिक ठिकाणी गोळा झालेला कचऱ्याची साफसफाई करण्यात आली. पावसाचा जोर कमी झाल्याने व पुर ओसरल्याने बुधवारी शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन पूर्वपदावर आले होते.
मात्र पावसाचा वाढता जोर हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा ईशारा यामुळे प्रशासनाकडून नदीकिनाऱ्या लगत असणाऱ्या व्यापारी, नागरिक व ग्रामीण भागातील जनतेला सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. बुधवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने बुधवारी शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद होती.