राजापुरातील ‘त्या’ बिबट्याचा मृत्यू फासकीत अडकून

वनपाल जयराम बावधाने यांची माहिती; सर्व अवयव सुस्थितीत, गुन्हा दाखल

राजापूर:- तालुक्यातील मजरे जुवे – भालावली येथे मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यालगत मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्याबाबत उलटसुलट प्रश्न उपस्थित होत असतानाच फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे राजापूरचे पशु वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केल्याची माहिती राजापूरचे वनपाल जयराम बावधाने यांनी दिली.

दरम्यान, मृत बिबट्याचे विच्छेदन करण्यात आले असून सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्याचे चारही पंजे, जबडा आदी भाग आणि अवयव सुस्थितीत होते. मात्र ते कुजलेल्या अवस्थेत होते. आणि त्याच्या शरीरावर कुठेही गोळी लागल्याची खूण नव्हती. मात्र लावलेल्या फासकीत अडकून बिबट्या मृत्यूमुखी पडला होता अशी माहिती राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी भगत यांनी दिल्याचे राजापूरचे वनपाल जयराम बावधाने यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपीविरोधात विभागीय वन अधिकारी, (चिपळूण, रत्नागिरी) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध वनविभागाकडून सुरु असल्याची माहिती राजापूरचे वनपाल जयराम बावधाने यांनी दिली. पुढील तपास सहायक वनसंरक्षक रत्नागिरी व वन परिक्षेत्र अधिकारी हे करत आहेत, अशी माहिती देण्यात आली.

विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांका लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मृत बिबट्यास लाकडाची चिता रचून त्याला सर्व अवयवांसहित दहन करण्यात आले. त्यावेळी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनपाल लांजा सारीक फकीर, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक कोर्ले श्रावणी पवार व रेस्क्यू टीमचे नीतेश गुरव, नीलेश म्हादये उपस्थित होते. अशा स्वरूपाच्या घटना कुठे घडल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.