राजापूर:- अलीकडे महामार्गावरील अपघातांच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशाच अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कणकवलीजवळ भीषण दुर्घटना घडली. या अपघातात राजापूर येथील दुचाकीस्वराचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे.
अमान गनी खतीब (21) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. अमान आपल्या मोटरसायकलवरून सिंदूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथून पुन्हा राजापूर येथे निघाला होता. यावेळी ट्रकला लागलेल्या जोरदार धडकेनंतर भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी साडे दहा ते ११ वाजण्याच्या दरम्यान महामार्गावर फोंडा उंबरट फाटयावर हा अपघात झाला.
राजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गनी खतीब यांचा अमान सुपुत्र होता. अमान गनी खतीब (21) कणकवली फोंडा येथे झालेल्या दुचाकी अपघातात नववर्षाच्या तोंडावर कायमचं जग सोडून गेला. अमान याच्या अपघाती मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अमान खतीब हा बुधवारी सकाळी कामानिमित्त आपली दुचाकी घेऊन सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीकडून राजापूरकडे परतत असताना त्याची फोंडा उंबरट फाटा येथे ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर शहरातील अनेक व्यापारी आणि अमान याच्या मित्र परिवाराने कणकवलीकडे धाव घेतली. अमानच्या अपघाती मृत्युमुळे खतीब कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा अमान हा पुतण्या होता.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कणकवलीचे पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केलं. अपघातग्रस्त अमानला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.









