राजस्थानमधून पळालेली दोन अल्पवयीन मुले रत्नागिरी रेल्वे स्थानकातून ताब्यात

रत्नागिरी:- अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून राजस्थानमधून दोन अल्पवयीन मुले घरातून पळून गेली. ही मुले  रत्नागिरीत आल्याची खबर पोलिसाना मिळाली. फिरणे आणि नोकरी करण्याच्या हेतूने त्यांनी रत्नागिरी गाठली, मात्र रत्नागिरीत रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. 

या दोन मुलांपैकी एक सतरा वर्षाचा तर दुसरा साडेसतरा वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी ८ डिसेंबर रोजी या मुलांनी राजस्थान येथील एका कनिष्ठ महाविद्यालयातून दप्तर तेथेच ठेवून पलायन केले. राजस्थानहून ते दिल्ली येथे गेले तेथून परत महाराष्ट्राकडे जाणारी ट्रेन पकडून रत्नागिरीत दाखल झाले. त्यावेळी  तिकीट नसल्यामुळे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

शहर पोलिसांनी त्या मुलांची चौकशी केली असता आपल्याला अभ्यासात रस वाटत नसल्यामुळे फिरण्यासाठी व कुठे काम मिळेल या आशेवर रत्नागिरी गाठल्याचे त्यांनी सांगितले. दोघानाही चाईल्ड लाईन संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. या मुलांच्या आई-वडिलांनी अपहरण झाल्याची तक्रार राजस्थान येथे दाखल केली आहे. त्यांच्या आई वडिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.